ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वर मराठी निबंध Saint Dnyaneshwar Essay in Marathi

Saint Dnyaneshwar Essay in Marathi: एवढा मोठा ग्रंथयज्ञ केल्यावर त्या ज्ञानियाच्या राजाने – संत ज्ञानदेवाने जे पसायदान मागितले, त्यांत स्वतःसाठी काहीही मागितले नाही; तर या जगातील प्राणिमात्रांना जे जे काही हवे असेल ते ते त्यांना मिळो, हे मागणे विश्वात्मक देवाकडे केले. केवढं मोठं मन ! आणि हे सुद्धा वयाची विशी ओलांडण्यापूर्वीच !

जो जे वांछील तो तें लाहो। प्राणिजात ।।

 

ज्ञानियांचा राजा संत ज्ञानेश्वर मराठी निबंध Saint Dnyaneshwar Essay in Marathi

संत ज्ञानेश्वरांचे आचारविचार हे सर्व काही जगावेगळे होते. त्यांच्या वाट्याला आलेली दुःखे, त्यांच्या वाट्याला आलेला ताप एवढा भयंकर की, हा विरक्त वृत्तीचा योगी पुरुषही एकदा जगाला कंटाळला आणि त्याने स्वतःला कोंडून घेतले. ‘नको हे स्वार्थी जग !’ असे त्यांच्या मनात आले. त्यावेळी संत ज्ञानदेवांच्या चिमुरड्या बहिणीने त्यांना बोध केला – ‘विश्व जाहलिया वन्ही । संतमुखे व्हावें पाणी ।’

संत ज्ञानेश्वरादी भावंडांत तत्कालीन कर्मठ समाजाकडून छळ का सहन करावा लागला? तर ती संन्याशाची मुले होती. आधी संन्यास घेतल्यावर गुरुजींच्या सांगण्यावरून संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी – विठ्ठलपंतांनी पुन्हा संसाराचा स्वीकार केला व त्यानंतर या चार मुलांचा जन्म झाला. संत ज्ञानदेवांचा जन्म शके ११९७ मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीस झाला होता. संन्यास घेतल्यावर पुन्हा संसार केल्याबद्दल संत ज्ञानदेवांच्या आईवडिलांना कर्मठ समाजाने देहान्त प्रायश्चित्ताचीही शिक्षा ठोठावली. त्यामुळे बालवयात ही चार भावंडे पोरकी झाली.

अशा समाजात संत ज्ञानदेवांनी आपल्या कर्तृत्वाने असे स्थान मिळवले की, संत ज्ञानदेव ही त्यांना आपली माउली वाटू लागली. समाजातील दुष्टावा नष्ट करण्यासाठी संत ज्ञानदेवांनी ‘भागवत धर्माच्या छताखाली सर्व समाजाला एकत्र आणले. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही, हे लोकांच्या मनात ठसवून, त्यांनी लोकांना ‘ नामस्मरण’ हा देवभक्तीचा सोपा मार्ग दाखवला. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांच्या वारीत सर्व धर्मजातीचे लोक एकत्र आले. सर्वांना घेऊन ते पंढरपुरास गेले.

“माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेइन गुढी ।।
पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले॥”

अशा आर्त शब्दांनी त्यांनी आपले मनोगत, आपली तळमळ बोलून दाखवली आहे. संस्कृतात असलेली गीता स्त्रीशुद्रादिकांना अप्राप्य होती. म्हणून संत ज्ञानदेवांनी ती मराठीत आणली. आपल्या समोरच्या समाजाला गीतेचा भावार्थ समजावून सांगण्यासाठी संत ज्ञानदेवांनी ‘भावार्थदीपिका’ सांगितली. मराठी भाषेविषयी संत ज्ञानदेवांच्या मनात मोठा आदर होता.

ज्ञानेश्वरीतील शब्दाशब्दांतून संत ज्ञानदेवाचा विनय व्यक्त होतो. ज्ञानेश्वरीनंतर त्यांनी आठशे ओव्यांचा ‘ अमृतानुभव’ हा स्वतंत्र ग्रंथ लिहिला. वयोवृद्ध, तपोवृद्ध योगिराज चांगदेव यांच्या को या पत्राला उत्तर म्हणून ‘चांगदेव पासष्ठी’ हा ६५ ओव्यांचा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी रचला. याशिवाय आपल्या भोवतालच्या सामान्य जनासाठी हजारो अभंग रचले.

संत ज्ञानदेवांनी भागवत धर्माचे जे इवलेसे रोप लावले, ते महाराष्ट्रभर पसरले आहे. त्याचे वर्णन करताना संत ज्ञानदेव म्हणतात,

“इवलेसे रोप । लावियेले द्वारी । त्याचा वेलु गेला गगनावरी ।।
मोगरा फुलला, मोगरा फुलला । फुले वेचिता बहरू कळियासि आला ।”

अशा संत ज्ञानदेवांनी आपले कार्य संपले असे मानून शके १२१८ मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे समाधी घेतली.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!