छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi: ‘झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा ।’ हे वर्णन ज्यांना चपखल लागू पडते ते म्हणजे छत्रपती श्रीशिवाजी महाराज ! म्हणूनच आज तीनशे वर्षे उलटून गेली तरी लोकांच्या मनातील महाराजांचे स्थान अढळ आहे. छत्रपती शिवाजीराजांचे राजा आणि व्यक्ती म्हणून कर्तृत्व हे अतुलनीय होते. त्यांचे चारित्र्य अत्युच्च होते, म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाच्या तोफा कालशिरावर अखंड झडतच राहतात.

 

छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध Chhatrapati Shivaji Maharaj Essay in Marathi

शिवरायांचा जन्म १६३० मध्ये झाला. १६८० साली त्यांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली. म्हणजे अवघे पन्नास वर्षांचे आयुष्य. पण या अल्प काळात राजांनी केलेली कामगिरी अपूर्व ठरणारी आहे. या यशाचे श्रेय या योगी पुरुषाच्या अजोड कर्तृत्वात आणि महान चारित्र्यातच दडलेले आहे.

शिवनेरी किल्ल्यावर शहाजी भोसले व जिजाबाई यांच्या या सुपुत्राचा जन्म झाला. शिवरायांना पित्याचा सहवास अपुराच मिळाला. पण त्यांच्या कर्तबगार, शूर मातेने या आपल्या ‘असामान्य पुत्राला आपल्या तेजस्वी विचारांचे बोधामृत पाजून परिश्रमपूर्वक घडवले. शिवाजीराजांचे आजोबा मालोजी व पिता शहाजी हे दोघेही शूर होते. त्यांच्या पराक्रमाचा वारसा शिवरायांना मिळाला, शिवाजीराजांनी महाराष्ट्रात प्रथम स्वराज्याचे बी रुजवले आणि त्याचा वेलू वाढवला, स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी शिवरायांना अतोनात मेहनत करावी लागली. या सर्व घडामोडीत शिवरायांच्या वाट्याला दगदगीचे जीवन आले; पण राजांनी कधी माघार घेतली नाही. आदिलशाही, निजाम यांच्याबरोबरच काही वेळेला स्वकीयांचाहीविरोध सहन करावा लागला. कधी शक्तीचा तर कधी युक्तीचा वापर करून त्यांनी आपले स्वराज्याचे स्वप्न साकार केले. ६ जून १६७४ रोजी हा शूर वीर राजसिंहासनावर बसला. पण ही तो श्रींची इच्छा’ अशी त्यांची विचारसरणी होती: हे ‘ जनतेचे राज्य’ आहे, असेच ते मानत. भारतातील लोककल्याणकारी राज्याची पहिली कल्पना येथे साकार झाली.

शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरू केला. त्याचबरोबर राज्यकारभारविषयक एक सुसूत्र नियमावली तयार केली. अष्टप्रधानांची नियुक्ती केली. त्यांच्या मार्गदर्शनासाठी ‘राजव्यवहारकोश’ तयार करून घेतला. राज्याभिषेकानिमित्त होन’ आणि ‘शिवराई’ ही दोन नवी नाणी व्यवहारात आणली. शिवाजी महाराजांची शासकीय मुद्रा संस्कृतात आहे. राजांनी स्वराज्याचे मानचिन्ह म्हणून भगव्या ध्वजाची निर्मिती केली.

आपल्या राज्याचा कारभार कसा चालावा, याबद्दल महाराजांनी काटेकोर नियम केले होते. राज्याचा कारभार जनताभिमुख ठेवायचा असेल, तर मुलकी सत्ता ही लष्करी सत्तेहून श्रेष्ठ असली पाहिजे, असे महाराजांचे आदेश होते. शिवरायांचा महत्त्वाचा विशेष म्हणजे ते आपल्या प्रजेला सर्वांत श्रेष्ठ मानत आणि सेना व शासनकर्ते यांच्याकडून प्रजेला त्रास होऊ नये काळजी घेत. म्हणूनच लोकांना हा जाणता राजा आपला खराखुरा राजा – लोकांचा राजा वाटतो.

Share:

पेटलेली पणती घेऊन, पायाखालची वाट चालत जायची आहे, नवीन वाटांना पायदळी तुडवताना, रचलेल्या शब्दांच्या जोरावर आयुष्याचा वणवा करायचा आहे!!